Monday, February 15, 2016

गुरु सांगाती

तस्मै श्री गुरवे नम:



संध्याकाळचा मंद वारा त्या बकुळीच्या फुलांचा सडा डोहाच्या नितळ व शीतल पाण्यात पाडत होता. बकुळीच्या त्या फुलांचा गंध साऱ्या माळरानात पसरलेला होता. घरट्यात परतणाऱ्या त्या चिमण्यांचा चिवचिवाट जणू मधुर स्वरांच्या गायिकांनी छेडलेला साजच वाटावा इतका कर्णमधुर वाटत होता. सूर्यनारायण अस्ताच्या वाटेवर होते. त्यांच्या रथाला जुंपलेल्या घोडयांच्या टापांमुळे आकाशात चौफेर गुलाल उधळला होता. हवेत आता थोडासाच पण हवाहवासा गारवा जाणवत होता. जवळच असलेल्या साईमंदिरातील कळसावरची पताका डौलाने फडकत साईबाबांची थोरवी आळवित होती. त्या पताकेचा धर्मही कोणता? मानवतेचाती ना हिंदुसारखी भगवी होती ना मुसलमानांसारखी हिरवी. तिच्या त्या सुवर्णकांतीवर सूर्यकिरणे पडून ती आता सोन्याच्या दागिन्याप्रमाणे भासत होती. ज्या अनंतकोटी ब्रह्मांडनायकाने लोककल्याणार्थ पांढरी फाटकी कफनी आयुष्यभर धारण केली त्या हिऱ्यासमोर त्या पताकेचे तेज मात्र पार फिके भासत होते.

अशा चैतन्यमय वातावरणात एक व्यक्ती मात्र स्वतः भोवती दुःखाची काळीकुट्ट भिंत उभारून स्वतःमध्येच हरवलेली होती. त्या डोहाच्या पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहत डोळ्यातून अश्रू गाळत होती. बाहेरचे वातावरण शांत असूनही त्या व्यक्तीच्या मनात मात्र दुःखाचे वादळ उठले होते. चेहऱ्यावर वाढलेली दाढी-मिशी, डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे, निस्तेज डोळे, सुकलेले ओंठ,  कासनुसे वाढलेले केस ह्यामुळे जेमतेम 22 वर्षांचा असूनही तो तरुण पस्तिशीतला दिसत होता. त्याच्या अंगावरचे कपडे पाहून तो कोणी चांगल्या घरातला तरुण असल्याचे जाणवत होते. कित्येक दिवस तो असाच भटकत होता. त्याच्या पोटात अन्नही नव्हते.

केदार तसा हुशार व चुणचुणीत तरुण होता. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला होता. तो हसऱ्या मुखाचा व मनमिळावू होता. शिक्षकांनाही तो प्रिय होता. अभियांत्रिकीच्या मागील तीन वर्षांत त्याने विश्वविद्यालयाचा क्रमांक कधीच गमावला नव्हता. त्याचे वडील सुप्रसिद्ध डॉक्टर असून आई एका चांगल्या बँकेत नोकरी करत होती. एकुलता एक केदार मोठ्या लाडात वाढला होता. त्याला जे हवे असायचे ते त्याचे आई वडील त्याला पुरवायचे. फक्त एक गोष्ट सोडुन; ती म्हणजे त्याच्यासाठी स्वत:चा वेळ. नुकतीच त्याला महागडी स्पोर्ट्स बाईक वाढदिवसाची भेट म्हणून दिली होती. आपल्या केदारचे गोडवे आई बाबा गात होते. त्याच्याकडून सर्वांना खूप अपेक्षा होत्या. परीक्षेला दोन महिने राहिले असतानाच त्याला जर्मनीतल्या एका आंतरराष्ट्रीय आस्थापना चांगल्या पगाराची नोकरीही लागली होती. परीक्षेनंतर तो जर्मनीला जायची तयारी करत होता. कॉलेजमध्येच त्याला जेनी नावाची मुलगी आवडायची. तीही त्याच्याबरोबर पुढचे आयुष्य घालवायची स्वप्ने रंगवायची. पदीक्षेनंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांचा साखरपुडाही ठरवलेला होता. परीक्षेपासून काही दिवसांआधी त्याला मुख्याध्यापकांनी आपल्या कार्यालयात बोलावून यंदा आपल्या कॉलेजचे नाव साऱ्या महाराष्ट्रात प्रथम यायला हवे असे सांगून त्याच्या कष्टाळू स्वभावाबद्दल त्याचे कौतुक केले होते.

इतके सगळे चांगले असूनही दुधात माशी शिंकलीच. परीक्षेचा दिवस उजाडला. केदार आज रोजसारखा प्रसन्नचित्त वाटत नव्हता. त्याच्या मनावर दडपण दिसत होते. मागील दोन रात्रि न झोपता त्याने अभ्यास केला होता. पेपर सुरु होऊन अर्धा तास झाला असेल तोच केदारला डोळ्यांपुढे काळोख दिसायला लागला. त्याला चक्कर आली व तो बकावरच बेशुद्ध झाला. शिक्षकांनी त्याला उचलून स्टाफरूममध्ये नेले. त्याच्या शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले. कुणी कांदा नाकाशी धरला. त्याच्या वडिलांचे क्लिनिक जवळच असल्याने त्यांना बोलावण्यात आले. पंधरा वीस मिनिटांत तो शुध्दीवर आलाही, पण आता त्याला शिकलेले आठवत नव्हते. त्याच्या डोळ्यांतून निरंतर अश्रू वाहत होते, तो याद करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता पण त्याचा मेंदू विश्रांतीअभावी थकला होता. तीन तास उलटले. पेपर फारसा कठीण नव्हता. वर्गाबाहेर सगळ्यांची एकच चर्चा होती. केदारचे आता काय होणार? केदारला त्याच्या वडिलांनी गाडीत बसवले. केदारची नजर मात्र जेनीला शोधत होती. ती काही त्याला दिसली नाही.

केदारने स्वतःला आपल्या खोलीत कोंडून घेतले. आई बाबा कोणाशीच तो काही बोलेना. पुढच्या पेपरची तयारी करण्याचे सोडून तो रडत बसला. आयुष्यात हरण्याची चव त्याने याआधी कधी घेतली नव्हती. रात्री त्याने खोलीचे दार उघडले तर बाहेरच्या हॉल मधून त्याच्या कानावर आई-बाबांचे संभाषण पडले. त्यांच्या बोलण्यातून त्याला जाणवले की आजच्या प्रसंगाने त्याचे पुढील आयुष्यच त्याच्याकडून हेरावून घेतले आहे. आजचा पेपर त्याला सोडवता आला नाही, त्यामुळे त्याला पुढच्या सेमिस्टर मध्ये पुनः पेपर सोडविणे गरजेचे आहे. त्याची जर्मनीची नोकरी गेल्यातच जमा होती. आपल्या सहकाऱ्यांना काय सांगायचे हा प्रश्न आईपुढे उभा होता. जेनिबरोबरचा साखरपुडाही आता शक्य नव्हता कारण ती जर्मनीला निघणार होती.

केदारने दुःखी अंतःकरणाने परत दार लावून घेतले. त्याच्या मनाची घालमेल सुरु झाली. त्याने आपल्या मोबाईलवर जेनीशी संपर्क केला. जेनीला त्याने आपली परिस्तिथी सांगितली. जेनीने आधी त्याचे सांत्वन केले. ती त्याच्याशी किती प्रेम करते हे ही सांगितले पण जेव्हा त्याने तिला आपल्यासाठी थांबशील का?असा थेट प्रश्न केला त्यावर तिने उत्तर दिले नाही व काही क्षण दोगेही बोलले नाहीत. जेनीने फोन ठेवला. संपर्क तुटला तोही कायमचा. आत्महत्या करण्यासाठी केदार झेपावणार तोच त्याची नजर त्याच्या स्टडी टेबलवरच्या साईबाबांच्या प्रतिमेवर नजर पडली. त्याच्या जवळच असलेल्या होली क्रॉस वरही त्याची नजर पडली. आत्महत्येचा विचार कुठल्या कुठे पळून गेला. पण मनातील सल मात्र तसाच राहिला. आपल्या आजच्या प्रसंगाचे खापर त्याने देवांवरच फोडले. पुढेचे पेपर त्याने सोडलेच नाही. कॉलेज मध्येही गेला नाही. रोज रात्री झोपण्याआधी तो बाबांचे स्मरण करीत असे. पण हल्ली त्याच्या शेवटच्या वर्षाच्या प्रोजेक्टवर तो रात्रंदिवस काम करीत असे.रात्री झोपताना सुद्धा त्याच्या डोक्यात व ओठांवर साईनामाऐवजी वेगवेगळे फोर्मुले आणि संकल्पनाच होत्या. एकूण तो नकळतच पूर्णपणे त्याच्या गुरूंना विसरत चालला होता. आणि पेपरच्या दिवशी घडलेल्या गोष्टीनंतर तर त्याने देवालाच धारेवर धरले होते.

आई वडिलांना त्याच्यासाठी वेळ देता येत नव्हता.तरीही रात्री ते त्याच्याशी बोलण्याचा व समजावण्याचा प्रयत्न करत होते. वडिलांनी तर त्याच्यासाठी बाहेरून कौन्सेलर ‘मानसतज्ञ’ ठेवला पण तोही त्याला फारसा समजावू शकला नाही. शेवटी परीक्षा संपली. रिजल्ट आला, जेनी वर्गात पहिली आली होती. केदारने अनेकदा तिला फोन करण्याचा प्रयत्न केला पण तिने उचलला नाही. आधी रोज रात्री “गुड नाईट” व सकाळी “गुड मोर्निंग “ दिवसातून अनेकदा “लव यु “ वगैरे वोट्सएपवरचे संदेश ती दोघे एकमेकांना वारंवार करीत असे पण मागच्या काही दिवसात जेनीने संपर्कच तोडला होता. तिचा जर्मनीला जाण्याचा दिवस जवळ आला आणि तिने केदारला विमानामध्ये बसण्यागोदर शेवटचा फोन केला. ती त्याला म्हणाली की त्याच्यासारख्या पळपुट्या भेकड युवकबरोबर आयुष्य घालवणे तिला जमणार नव्हते. त्याच दिवशी केदारने कुणालाही न सांगता घर सोडले. केदारबरोबर काय झाले, त्याने का काय सहन केले ह्याचे साक्षी फक्त दोघेजण होते-  तो स्वत: आणि ज्याला त्याने धारेवर धरले असा त्याचा देव.

अशा ह्या संध्याकाळी आपल्या भूतकाळाच्या कटू आठवणीत हरवलेला केदार आपले पूर्वीचे ते प्रसन्नचित्त प्रतिबिंब डोहाच्या पाण्यात शोधात होता. हवेतला गारवा जाणवत होता. त्याच्या अंगात जराशी कणकणही होती.समोर साईमंदिरातून शहनाईच्या दैवी स्वरलहरी उमटत होत्या. जणू साई केदारला आपल्यापाशीच बोलावत होते. पण केदार मात्र आपल्या गुरूंना विसरून बसला होता. इतक्यात त्याच्या खांद्यावर उबदार हाताचा स्पर्श त्याला जाणवला. इतक्या दिवसात आपली साधी विचारपुसही कुणी केली नव्हती पण आज अचानक कुणी तरी आले म्हणून त्याने वळून पहिले तर एक वृध्द व्यक्ती त्याला दिसला. आपण पांघुरलेली मऊशार उबदार शाल त्याने केदारच्या भोवती गुंडाळली. आपल्या हातातली पुरचुंडी उघडून त्यातून साजूक तुपाच्या दोन पूरणपोळ्या त्याने केदारपुढे धरल्या व म्हणाला- “तू कोण कुठून आला आहेस  हे विचारण्याआधी मी आणलेल्या ह्या पूर पोळ्या खाऊन घे. खूप थकलेला दिसतोयस. घे.” केदारने त्या पुरणपोळ्या खाल्ल्या. त्याने इतक्या रुचकर पोळ्या कधीच खाल्ल्या नव्हत्या. त्या म्हातारबाबाने त्याला पाणी दिले.पाणी पिऊन व जरासा सावरून त्याने त्या वृध्द बाबांना पहिले. त्यांचा चेहरा त्याला कुठे तरी पहिला असल्यासारखा वाटला.चार दिवसामागे तो असाच भटकत एका इगर्जीच्या आवारात कोसळला होता तेव्हा अशाच एका ख्रिस्ती माय-लेकाने त्याला पाव भरविला होता. केदारने म्हातारबाबाला आपली कहाणी ऐकवली. पण जेनीबद्दल मात्र त्याने त्यांना काहीच सांगितले नाही. बोलताना नकळत त्याच्या डोळ्यांना धार लागली कदाचित जेनीच्या आठवणीने असेल. म्हातारबाबांनी त्याच्या कसनुश्या वाढलेल्या केसांवरून हात फिरविला. त्या मायेच्या स्पर्शाने केदारचे मन सुखावले.

 केदारचे डोके आपल्या मांडीवर घेऊन समजवणीच्या स्वरात तो म्हातारबाबा म्हणाला- “ पोरा एका परीक्षेत हरलास म्हणून आयुष्याची माती करायला निघालायस?.अरे इथे जीव वाचिवण्यासाठी लोक आटापिटा करता. आयुष्यात पुढे तुला ह्याहीपेक्षा खडतर परीक्षांना सामोरे जावे लागेल. जेव्हा जन्मानंतर बाळ आईच्या कुशीत पहिला टाहो फोडतो त्याच वेळी त्याच्या जीवनातील परीक्षा सुरु होतात. जन्मलेल्या शिशुला सुद्धा श्वास घेण्यापासून टाहो फोडण्याच्यापर्यंतच्या परिक्षेला सामोरे जावे लागते. अनेकदा आपल्याला अपयश येते. पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे विसरून कसे चालेल? अपयश चाखलेल्यांनाच  यशाचे खरे सुख कळते. प्रयत्न करणे इतकेच आपल्या हाती आहे. मोठमोठे डॉक्टर सुद्धा शस्त्रक्रियेत कधीतरी अपयशी होतातम्हणून का ते आपली सेवा सोडून देतात? आपल्या आयुष्यात जे काही घडते ते परमेश्वराच्या संमतीनेच घडते. वाईट घडण्यामागचा हेतू आपल्याला शिक्षा देणे हा नसून आपल्याला काही नवीन शिकविणे असा असतो. एक लक्षात ठेव आपल्या पूर्व जन्माच्या कर्माखातर अथवा आपण स्वतः केलेल्या हलगर्जीपणामुळे आपण कधी असे प्रसंग अनुभवतो पण त्याही प्रसंगी आपल्या कर्माचा एकमेव साक्षी असा ईश्वर आपल्या बरोबर असतोच. फक्त आपल्या डोळ्यांवर पंचविकारांची पट्टी बांधलेली असल्याने तो आपल्याला दिसत नाही. तुला मिळालेल्या नोकरीत पुढे कदाचित तुझे हित नव्हते म्हणूनच ती गेली असेल. कदाचित ह्याहूनही चांगली दुसरी नोकरी तुझ्यासाठी योजलेलीं असेल. आणि त्या मुलीबद्दल सांगायचे झाल्यास जी मुलगी आपल्याला समजून घेत नाही, आपली समजूत घालू शकत नाही, जिला अपयशी लोक आवडत नाही , ती पुढे जर तुला अपयश आले तर तुझी साथ देईलयाची खात्री तू देऊ शकला असतास? ज्या आई वडिलांनी तुला मागची 22 वर्षे माया केली त्या मायबापचा साथ तू  जिला जेमतेम तीन चार वर्षे ओळ्खतोस अशा पोरीसाठ सोडलास? मातृ देवो भव पितृ देवो भव हे विसरलास? ज्या गुरूंची भक्ती तू करत होतास त्या गुरूलाही विसरलास?शेवटपर्यंत श्रद्धेने आणि धैर्याने लढा देणे हा त्यांचा संदेश विसरलास? पोरा.......भानावर ये परत फिर.”

केदार एकदम स्तब्ध झाला. जेनिबद्दल त्याने म्हातारबाबांना काही सांगितलेच नव्हते. त्याचप्रमाणे आपण ज्या गुरूंची भक्ती करत होतो त्यांच्याबद्दल ह्यांना कसे कळले ह्यचेही आश्चर्य त्याला झाले. न राहवून त्याने म्हातारबाबांना ह्याबद्दल विचारले. म्हातारबाबांनी स्मित हास्य करत त्याच्या डोळ्यांत पहिले. केदारला ती नजर ओळखीची वाटली कदाचित हीच नजर त्याने आधीही कुठेतरी पाहिलेली होती. कदाचित त्याला भेटलेल्या त्या ख्रिस्ती माय् लेकांमध्ये? की त्याला अंगात सणसणता ताप असताना दवाखान्यात नेऊन त्याचावर मोफत उपचार केलेल्या त्या वृध्द मौलवीसाहेबांमध्ये? भ्रमिष्टासारखी त्याची अवस्था झाली. म्हातारबाबांनी त्याला गोंजारले व म्हणाले –“ पोरा आता माझ्या निद्रेची वेळ झाली आहे.मला जायला हवे. त्या मंदिरातच आज  मी आसरा घेतलाय. तुला तिथे येण्याचा मी मात्र आग्रह करणार नाही बरे! तू मात्र उद्याच परत फिर”. म्हतारबाबांनी आपल्या जवळील ५०० रुपये त्याच्या खिशात कोंबले.व म्हणाले “ लेका कधीहि दुखले खुपले म्हणून रडत बसू नको. मी आहे सोबतीला तुझ्या... सदैवच“ असे बोलून म्हातारबाबा चालायला लागले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहून केदार दचकला. म्हातारबाबा दुसरे तिसरे कोणी नसून साईबाबाच असल्याची त्याची खात्री पटली. देवळात आता भक्त मंडळींची रहदारी वाढली होती. शेजारतीला (बाबांच्या निद्रेआधीची आरती) प्रारंभ होणार होता. बाबा पायरी चढत होते. त्यांनी शेवटचा कटाक्ष केदारवर फेकला. साक्षात अनंतकोटी ब्रह्मांडनायक साईबाबा त्याच्यासमोर उभे होते. बाबांच्या मागून पायरी चढून अनेक भक्त जात होते पण बाबांकडे कुणीच पाहत नव्हते.कदाचित त्यांना ते दिसंत नव्हते.

केदारकडे पाहून प्रेमळ स्मित करत साईबाबा म्हणाले- “जर तू श्रद्धा व सबुरी ठेवली असतीस तर तुझा प्रवास इथपर्यंत झालाच नसता .तुझ्या मनातील अंधार आणि माझ्याबद्दलचा राग दूर करण्यासाठी मलाही तुझ्यामागे सावलीप्रमाणे हिंडावे लागले. बाळा तू एकच हाक मारली असतीस तर हा साई तुझ्यासाठी धावत आला असता. तू स्वतःभोवती न्यूनगंडाची भिंत अशा पध्दतीने रोवली होतीस की मला तुझ्या पर्यंत पोचताच येत नव्हते. लक्षात ठेव आयुष्य म्हणजे एक रणांगण आहे. येथे प्रत्येक क्षणी, पावलोपावली कटू प्रसंग व निखारे असतीलच. पण जो कोणी धैर्याने या रणांगणाची वाटचाल करेल तोच खरा योद्धा ठरेल. स्वतः देव असूनही येशू ख्रिस्तांनी दुसऱ्यांसाठी दुःख यातना भोगल्या. प्रभू रामचंद्रांनी आपल्या राजधर्मासाठी आपल्या प्रिय पत्नीला वनवासाला पाठवले. भगवान बुद्धांनी समाजाच्या उद्धारासाठी ज्ञान अर्जन करण्यासाठी आपल्या सुखी संसारावरून नांगर फिरविला. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनीही गांधारीच्या शापाची पूर्तता करण्या हेतूने जरा ह्या पारध्याच्या करवी आपला वध करवून घेतला. मी स्वतः भक्तांची दुखणी आपल्या अंगी घेऊन दुसऱ्यांना दुखःमुक्त करतो. आयुष्यात आपण काय मिळविले यापेक्षा आपण दुसऱ्यांना काय दिले ह्याचे महत्व अधिक आहे. तू सदाचाराने वाग, आपल्या आयुष्याची पुनः नव्याने सुरुवात कर, नव्या जोमाने अभ्यास कर. माझी अकरा वचने विसरलास? मी तुझ्यासोबत असताना भीती कसली?. सबका मलिक एक. तुझे कल्याण असो.” असे म्हणून साई देवळात गेले.

रात्र झाली होती. देवळातून घंटानाद ऐकू आला व पाठोपाठ आरतीचे बोल केदारच्या कानी पडले- “ रहम नजर करो अब मोरे साई….तुम बिन नही कोई माँ बाप भाई।…” आणि नकळतच केदारची पावले देवळाकडे वळली.


ओम साई राम